भाऊसाहेब भोईर यांचा लढण्याचा निर्धार, आज अर्ज दाखल करणार
पिंपरी – ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असून उद्या सोमवार ( दि. 28 ) रोजी रॅली काढून भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
भाऊसाहेब भोईर यांनी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी निर्धार मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात त्यांनी शहराच्या दुरावस्थेस सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करत आपले विचार मांडले होते. आपल्यावरील अन्यायाचा पाढाही वाचला होता काही झाले तरी लढणारच असे त्यांनी त्याच वेळी स्पष्ट केले होते. त्यानंतर लगोलग प्रचारास लागून त्यांनी प्रचारात आघाडीही घेतली आहे. दरम्यान लढण्याचा निर्धार कायम ठेवत उद्या सोमवारी ते आपला उमेदवारी अर्ज ग क्षेत्रीय कार्यालय येथे दाखल करणार आहेत. भोईर नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून रॅली काढण्यात येणार आहे कै.सोपानराव भोईर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात होईल. पुढे चिंचवड गावात क्रांतिवीर चापेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे त्यानंतर श्री मंगलमूर्ती वाडा, धनेश्वर मंदिर मार्गाने ग क्षेत्रीय कार्यालयापर्यंत जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या आधी सकाळी नऊ ते दहा या वेळात ते सकाळी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर रॅलीने जाऊन दुपारी बाराच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्त काढण्यात येणाऱ्या रॅलीत कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत मात्र चिंचवड मतदार संघातील नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने या रॅलीत सहभागी होऊन मला आशीर्वाद द्यावेत असे आवाहन ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.